मलकापूरच्या पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाला 'युजीसी'कडून स्वायत्तता; शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा तुरा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



मलकापूर (प्रतिनिधी): स्थानिक शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत देदीप्यमान आणि ऐतिहासिक टप्पा आज मलकापूरच्या शिरपेचात रोवला गेला आहे. येथील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 'स्वायत्त संस्था'  म्हणून दर्जा बहाल करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १९ मार्च २०२६ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, १३ एप्रिल २०२६ रोजी त्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक यशामध्ये महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे दूरदृष्टीकोन आणि खंबीर पाठबळ अत्यंत मोलाचे ठरले आहे.


संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे, तसेच सदस्य श्री. अनिल इंगळे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. पराग पाटील आणि डॉ. गौरव कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या नेतृत्वाखाली, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे आणि आयक्यूएसी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. नितीन खर्चे यांनी या स्वायत्ततेच्या प्रक्रियेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या निर्णयामुळे आता महाविद्यालयाला स्वतःचा आधुनिक अभ्यासक्रम तयार करणे, उद्योगजगताच्या गरजांनुसार परीक्षेचे नियोजन करणे आणि शैक्षणिक स्वांतत्र्याचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलणे शक्य होणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाने पायाभूत सुविधा, संशोधन आणि उत्कृष्ट निकालांच्या जोरावर हा बहुमान मिळवला असून, यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. 


या यशाबद्दल व्यवस्थापन मंडळातील सर्व पदाधिकारी, प्राचार्य, अधिष्ठाता, समन्वयक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. स्वायत्ततेच्या या नव्या दर्जामुळे विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे तांत्रिक शिक्षण मलकापूरमध्येच उपलब्ध होणार असून, ही बाब जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)