मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. "नमो एग्री वीर-13" हा स्मार्ट शेती तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प संपूर्ण भारतभर स्पर्धेत सातव्या क्रमांकावर आला असून, ग्रीन इकॉनॉमिक श्रेणीत पहिले स्थान मिळवत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. या प्रकल्पाचे भव्य सादरीकरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ प्रमुख अरुण चौहान आणि डीजी एनसीसी कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. त्यांनी या अभिनव संकल्पनेचे भरभरून कौतुक करत "नमो एग्री वीर-13" प्रकल्प भारतीय शेती आणि संरक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा असल्याचे गौरवोद्गार काढले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशेष गौरव करताना सांगितले की, "कोलते महाविद्यालयाच्या या अभिनव प्रकल्पाने भारतीय शेती क्षेत्राला एक नवीन दिशा दाखवली आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून भारताच्या अन्नसुरक्षेसाठी आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल." दिनांक १० मार्च रोजी संध्याकाळी ६:०० ते ७:०० या वेळेत, दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे या स्मार्ट शेती प्रकल्पाचे भव्य सादरीकरण केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या समोर करण्यात आले. या विशेष क्षणी देशभरातील नामांकित पत्रकार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले, "कोलते महाविद्यालयाने या अनोख्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीचा आदर्श घालून दिला आहे. हा प्रकल्प संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहे."
या ऐतिहासिक क्षणी पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते आणि प्राचार्य डॉ. अनिल खर्चे हे स्वतः उपस्थित होते. "हा प्रकल्प केवळ कोलते महाविद्यालयाची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची ओळख बनला आहे. हा अभिनव प्रयोग भारतीय शेतीच्या प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे." असे वक्तव्य यावेळी डॉ. अरविंद कोलते यांनी केले. त्यांनी या यशस्वी प्रकल्पाचे महत्त्व आणि महाविद्यालयाच्या योगदानावर प्रकाश टाकत संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले. या अभूतपूर्व यशामागे महाविद्यालयातील एक अतिशय मेहनती आणि कष्टाळू टीम कार्यरत होती. या टीमने हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. टीम लीडर लेफ्टिनेंट मोहम्मद जावेद यांनी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते अंतिम सादरीकरणापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केले. प्रो. सुदेश फरपट यांनी तांत्रिक मजबुतीची जबाबदारी पार पाडली, तर प्रो. विजय ताठे यांनी प्रोग्रामिंग आणि इन्स्टॉलेशनचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. कॅडेट वैभव जमडाले यांनी प्रभावी सादरीकरण करून संपूर्ण टीमचे नाव उंचावले, तर श्री. दीपक पालवे यांनी प्रकल्पाच्या वाहतुकीसाठी आणि सेटअपसाठी विशेष योगदान दिले.
या ऐतिहासिक विजयाबद्दल कोलते महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे, सदस्य श्री. अनिल इंगळे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. पराग पाटील. डॉ. गौरव कोलते, प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे आणि संपूर्ण व्यवस्थापनाने प्रकल्प टीमचे भरभरून कौतुक केले. हा प्रकल्प केवळ एक विजय नाही, तर संपूर्ण देशात महाराष्ट्रातील नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे प्रतीक बनला आहे. या प्रकल्पामुळे हे सिद्ध झाले आहे की योग्य दिशा आणि मेहनत असेल, तर भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावर इतिहास रचू शकतात. "नमो एग्री वीर-13" हा केवळ एक प्रकल्प नाही, तर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, तांत्रिक प्रगती आणि कष्टाच्या यशाची कहाणी आहे. कोलते महाविद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, "सपने मोठे असतील आणि त्यांना साकार करण्याची जिद्द असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही!" हा प्रकल्प आता संपूर्ण देशभर नावाजला जात आहे.
