मलकापूर : आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना आवश्यक कौशल्ये मिळवून देण्यासाठी पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी व आपत्ती व्यवस्थापन क्लबच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी अकोल्याचे नामांकित आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ मा. श्री. सुधीर कोचले सर व मा. श्री. शैलेन्द्र मडावी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेच्या प्रारंभी मान्यवरांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देत, नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींसाठी पूर्वतयारी आणि योग्य प्रतिसाद कसा द्यावा यावर सखोल चर्चा केली. तसेच तातडीच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित आपले प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तर मिळवली. विशेष म्हणजे, आपत्ती वेळी लागणाऱ्या महत्त्वाच्या सुरक्षा पद्धतींचे प्रात्यक्षिकही या कार्यशाळेत दाखवण्यात आले.
कार्यशाळेचे आयोजन आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. माधुरी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख प्रा. योगेश सुशीर, प्रा. संतोष शेकोकर, प्रा. सुदेश फरफट, प्रा. नितीन खर्चे, डॉ. अमोघ माळोकर तसेच प्रा. तेजल खर्चे, डॉ. मंजीरी करांडे, प्रा. नेहा माळोकर, प्रा. एस. एस. पवार, प्रा. एम. आर. राजपूत, प्रा. पी. बी. पट्ठे, प्रा. आचल गोळे, प्रा. निलेश बुडूखले आणि प्रा. अमोल हळदे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी आयक्यूएसी समन्वयक, आपत्ती व्यवस्थापन क्लबचे सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.
