पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी २०२४ च्या बॅचसाठी भव्य पदवी वितरण समारंभ जल्लोषात पार पडला. विद्युत, यांत्रिकी, स्थापत्य, संगणक या शाखांतील विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिकृत विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. विद्येच्या देवी सरस्वतीचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण सभागृहात पवित्रता, शिस्त आणि गौरवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र धोरे, सिनेट सदस्य श्री. राजेंद्रप्रसाद पांडे, तसेच मलकापूरचे तहसीलदार श्री. राहुल तायडे उपस्थित होते. यावेळी मंचावर खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी, विभागप्रमुख डॉ. अमोघ मालोकार, प्रा. योगेश सुशीर, प्रा. सुदेश फरपट, प्रा. नितीन खर्चे आदी मान्यवरही उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश मिळाले. डॉ. महेंद्र धोरे यांनी विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्याच्या शिक्षणाची सुरुवात आजपासून होत असल्याचे सांगून सद्भाव, ज्ञान व नैतिकतेवर आधारित अभियंते समाजासाठी वरदान ठरतात, असे प्रतिपादन केले. सिनेट सदस्य श्री. राजेंद्रप्रसाद पांडे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीकडे न पाहता स्टार्टअप्स, डिजिटल इंडिया, ग्रीन एनर्जी यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी शोधाव्यात असे मार्गदर्शन केले. तहसीलदार श्री. राहुल तायडे यांनी शासनाच्या विविध योजनांत अभियंत्यांसाठी असलेल्या मोठ्या संधींबाबत विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमात सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर दिला पाहिजे असे सांगितले. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी भारतीय अभियंत्यांची जागतिक स्तरावर असलेली ओळख विद्यार्थ्यांनी टिकवावी, त्यासाठी तांत्रिक ज्ञानाबरोबरच माणुसकी व सहकार्याची जपणूक करावी, असे मार्गदर्शन केले. प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी विद्यार्थ्यांचा प्रवास आज संपत नसून नव्या शिखरांच्या दिशेने सुरू झाल्याचे सांगितले. बदलत्या युगाशी जुळवून घेण्यासाठी सतत स्वयं-अधिगम महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पांडुरंग चोपडे, प्रा. पांडुरंग भिसे, प्रा. तेजल खर्चे, प्रा. संगीता खर्चे, डॉ. मंजिरी करंडे, प्रा. भाग्यश्री नारखेडे, प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. मनीष अचेलिया, प्रा. निलेश बुंधे, प्रा. निलेश बुडुखले, प्रा. दीपक खरात, प्रा. अंकुश नारखेडे, प्रा. पुनम पट्ठे यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा. नेहा मालोकार यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. युगेश खर्चे यांनी औपचारिक आभारप्रदर्शन करत सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आयोजक, विद्यार्थी व पालकांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील गोड आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक पालकांच्या डोळ्यातून अभिमानाश्रू वाहत होते.
