पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांची पुण्यतिथी पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्यंत भक्तिभावाने साजरी जीवनकार्याची प्रेरणादायी आठवण करून देणारा कार्यक्रम

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर– विदर्भातील सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात दैदिप्यमान ठसा उमटवणारे विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांची पुण्यतिथी पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे अत्यंत श्रद्धा, आदर आणि प्रेरणेतून साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांच्या समर्पित जीवनाचे स्मरण करताना विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान, विचार आणि सामाजिक बांधिलकी यांचे बीज रोवले गेले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक मौन पाळण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, "पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाला शहरांच्या तुलनेने समान दर्जा मिळावा म्हणून अथक परिश्रम घेतले. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. 'कोलते' या नावानेच विदर्भात ज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला आहे."

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी अत्यंत हृदयस्पर्शी भाषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, "पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते हे एक व्यक्तिमत्त्व नव्हते, ते एक विचार होते. त्यांनी ग्रामीण शिक्षण, साहित्यसेवा आणि सामाजिक जागृती यांची त्रिसूत्री राबवली. आजही त्यांच्या विचारांचा प्रकाश आमच्या शिक्षणप्रणालीत जाणवतो. माझे स्वतःचे संशोधन त्यांच्या साहित्यावर केंद्रित असून त्यातून मला त्यांच्या विचारसरणीचा अधिक निकटून अनुभव घेता आला."

या प्रसंगी प्रशासकीय डीन प्रा. युगेश खर्चे यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले, "पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते  यांचे जीवन हे प्रत्येक शिक्षणप्रेमी तरुणासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांनी केवळ ज्ञान दिले नाही, तर संस्कार दिले. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात बदल घडवावा."

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष दिवशी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे, प्रा. गजानन सुपे, प्रा. अमोघ मालोकार, प्रा. नेहा मालोकार, प्रा. स्नेहल पवार, प्रा. संगीता खर्चे, प्रा. प्रविण पाटील, प्रा. राजेश सरोदे, प्रा. कैलास कोळी यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे रमाकांत राणे, मोहन कोलते, प्रतीक कोलते, सचिन कोलते, सचिन शेलार, बलदेव राजपूत यांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष भावस्पर्शी स्वरूप देणारी ठरली.

कार्यक्रमाच्या नियोजनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित सर्व मान्यवरांनी पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते  यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली आणि त्यांच्या जीवनकार्याला अभिवादन केले. संपूर्ण वातावरणात एक प्रेरणादायी शांतता आणि विचारांचा उदात्त झंकार जाणवत होता. हा कार्यक्रम म्हणजे डॉ. कोलते यांच्या विचारांचा वसा पुढे नेण्याचा एक पवित्र संकल्प होता.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)