मलकापूर, दि. २७ नोव्हेंबर
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले मदतपॅकेज अजूनही बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मलकापूर तहसील कार्यालया वर चढून आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी केले.
“१८,५०० जाहीर, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त ८,५००” – निलेश नारखेडेंची प्रशासनावर सवालबाजी
ऑगस्ट–सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने हेक्टरी १८,५०० रुपयांची मदत जाहीर केली होती.मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ८,५०० रुपये जमा झाल्याचे निदर्शनास येताच नारखेडे यांनी प्रशासनाला जबाबदार धरत कठोर सवाल उपस्थित केले.
ते म्हणाले,“घोषित रक्कम आणि प्रत्यक्ष मिळालेली रक्कम यात मोठा फरक का? अनेक शेतकरी महिन्यांपासून तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा का घेतली जात आहे?”
घोषणाबाजीने तहसील परिसरात तणाव; शासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत शासनाच्या दिरंगाईचा तीव्र निषेध नोंदवला.
अनुदान वितरित करण्यातील विलंब, जिल्ह्यांतील अनुदानातील कथित अनियमितता आणि पात्र शेतकऱ्यांना न मिळालेली मदत यावरून अधिक तीव्र आवाज उठवण्यात आला.
तहसीलदारांची मध्यस्थी; “१० दिवसांत उर्वरित अनुदान वितरित” – आश्वासन
चालत असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत तहसीलदार राजगुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
चर्चेनंतर त्यांनी १० दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान खात्यात जमा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.या आश्वासनावर समाधान व्यक्त करत आंदोलन तत्पुरते मागे घेण्यात आले.
“अनुदान न मिळाल्यास मोठी लढाई उभा करू” – स्वाभिमानीचा इशारा
निलेश नारखेडे म्हणाले,
“शासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना याहून व्यापक, संघटित आणि तीव्र आंदोलन पुकारेल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची लढाई अडणार नाही."पदाधिकारी व शेतकऱ्यांची व्यापक उपस्थिती आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष – बाळू भाऊ ठाकरे,
मलकापूर तालुकाध्यक्ष – गोपाल सातव,नांदुरा तालुकाध्यक्ष – रामदास डोसे,यांसह निंबाजी तायडे, आदित्य गिरे, गौतम गुरचळ, अनंत राऊत व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
