शहरवासियांना जाहीर आवाहन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

शहरात राहणाऱ्या माझ्या सर्व सुसंस्कृत बंधू आणि भगिनींनो, आपल्या ताटातला अन्नाचा कण अन्  कण शेतकऱ्याच्या घामाने पिकला आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवणे बंद केलं तर आपण काय खाणार? अजून तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यांमध्ये अन्न निर्मितीची सोय झालेली नाही, अन्नधान्य निर्मितीचे तंत्रज्ञान विकसितच झालेलं नाही. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही आणि देश सुद्धा टिकू शकत नाही. 
       बळीराजा आता संकटात आहे. अतिवृष्टीने त्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. *जे पीक वाचलं त्याला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव राहिलेला नाही.* यावर्षी तर सोयाबीन-कापसाचा उत्पादनखर्चही भरून निघणार नाही, अशी अवस्था आहे. यावर्षी सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च 6000/- रुपये आहे तर मिळणारा भाव 4000/- रुपये आहे. कापसाचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च 8500/- रू. आहे आणि बाजारात कापसाला भाव फक्त 6 ते 7 हजार आहे. त्यामुळे *शेतकरी आज तोट्यात आला आहे.* आणि त्याचा परिणाम... शेतकरी  आत्महत्याकडे प्रवृत्त होत आहे. ही सर्वांसाठी चिंतनाची बाब आहे. शेतकऱ्यांचा आता सर्वांवरचा विश्वास उडालेला आहे, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत झपाट्याने वाढ होत आहे.

*आज तो बळीराजा एकाकी पडलेला असतांना त्याला तुमच्या साथीची गरज आहे.*

अशा वेळी आपण आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याला आधार देण्याची नितांत गरज आहे. आज बळीराजा एकटा पडला आहे त्याला पाठबळ देणे, आधार देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. 

🔴 त्यामुळे शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, व्यापारी, विचारवंत, साहित्यिक, दुकानदार अशाच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. 🔴

रविवारी 6 नोव्हेंबर रोजी ही बळीराजाची फौज *आपल्या घामाचे दाम मागण्यासाठी* मोठ्या संख्येने बुलढाण्यात दाखल होत आहे. राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात ही आपल्या बुलढाण्यातून होत आहे. *या बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी या ‘एल्गार मोर्चा’त आपण सहभागी व्हा व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आधार द्या.* तुम्हा शहरवासीयांच्या आधाराची शेतकऱ्यांना प्रचंड आवश्यकता आहे. 

तुमची पाठीवरची थाप आणि एल्गार मोर्चातली साथ त्याला जगण्याला उभारी देणार आहे.

 त्यासाठी रविवारी 6 नोव्हेंबरला आपल्या पक्षाचे जाती-धर्माचे सर्व झेंडे बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून एकत्र या आणि आपल्या पोटात जाणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक घासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ‘एल्गार मोर्चा’त सहभागी होऊन बळीराजाला हिम्मत द्या. एक दिवस आपल्या अन्नदात्यासाठी आपण दिला पाहीजे. शेतकरी, शेतमजूर तुमची वाट पाहताय... नक्की या!

एल्गार मोर्चा*  (सोयाबीन-कापूस उत्पादकांचा)
दि.6 नोव्हेंबर 2022 दुपारी 12.00 वा.
स्थळ- जगदंबा माता (मोठी देवी) मंदिर पासून सुरू होऊन बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकेल.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)