बुलढाणा मागील काही वर्षापासुन राज्यात गुटखा बंदी असतांना देखील मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध तस्करी केली जात आहे. दरम्यान काल बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ जवळ मालवाहू वाहन पकडून त्यातील प्रतिबंधित गुटखा व वाहन असा एकुण ११ लाख ६६ हजार रुपयाचा जप्त केला आहे. प्रकरणी पोलीसांनी चिखली येथील गुटखा तस्कर निसार हाजीसह वाहन चालका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मलकापूर मार्गाने एका वाहनाने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बुलडाण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने आरटीओ कार्यालयाजवळ सापळा रचला. काही वेळानंतर मलकापुरकडून येत असलेल्या मालवाहु वाहनाची पोलीसांनी झडती घेतली असता, त्यामध्ये राज निवास सुगंधित पान मसाला व जाफराणी जर्दाचे पोते कॅरेट खाली मिळून आले. पोलीसांनी हे वाहन ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीसांनी आरोपी शेख सलीम शेख इस्माईल वय ५४ व हाजी निसार दोघे राहणार चिखली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ११ लाख ६६ हजार ३२८ रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अहेरराव हे करीत आहेत.
