धुळे : काही कारण नसताना तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शिरपूर येथील बालाजी मंदिराच्या परिसरात शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी सकाळी एकाविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहन दिलीप सोनवणे (१८) रा. शिरपूर) या तरुणाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शिरपूर येथील बालाजी मंदिराजवळ असलेल्या मनचली पान सेंटर येथे काहीही कारण नसताना एकाने वाद घातला.
वादाचे पर्यवसान शिवीगाळ व हाणामारीत झाले. यातून चाकू काढून त्याने उजव्या हाताच्या मनगटाजवळ मारल्याने गंभीर दुखापत झाली. याशिवाय जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकारानंतर जखमी अवस्थेत रोहन याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रोहन सोनवणे याने शिरपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी शिरपूर येथील भोईवाडा, खालचे गावमधील एका विरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक सोनवणे तपास करीत आहेत.

.jpg)