पाचोरा: जळगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत पाचोऱ्याच्या कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा जिंकत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव जिल्हा जळगाव आणि दिव्यांग शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावखेडा बु- जळगाव येथे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा झाल्या. यात पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील १३ जणांनी सहभाग नोंदविला.
त्यामध्ये १२ ते १६या वयोगटात १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रमोद काळे याने तृतीय तर १२ ते १६ या गटात निवृत्ती दीपक पाटील याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला तसेच बहुविकलांग प्रवर्गात ८ ते १२ या वयोगटात युवराज शिरीष पाटील या स्पर्धकाने लगोरी फोडणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. विजयी स्पर्धकांचा संस्थेचे अध्यक्ष, सचिव प्रदीप पांडे आणि मीनाक्षी पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

