मतदार यादीत मोठा घोळ..' मविआचे गंभीर आरोप, सरपंचाचे व्हिडिओ दाखवत भाजपला घेरलं!
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापुर:- राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदी नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षासह महायुतीवर गंभीर आरोप केलेत. एका महिला सरपंचाचा व्हिडिओ दाखवत मतदार यादीतून लोकांचे नावं काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मविआने केला आहे.
मविआचे भाजपवर गंभीर आरोप!
राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षासह महायुतीवर गंभीर आरोप केलेत. बुलढाणा जिल्ह्यातील तेलाना ग्रामपंचायतीच्या सरपंच (तालुका, चिखली) श्रीमती किरण गाडेकर यांचा एक व्हिडिओ दाखवत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधून नावे वगळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या महिला सरपंचांनी त्यांच्यासह गावातील ६० मतदारांचे नाव यादीतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे.
मतदार यादींमध्ये मोठा घोळ
यावरुनच मविआच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप रडीचा डाव खेळत आहे. मतदार यादीतून लोकांचे नावं काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दम असेल तर समोरासमोर लढा. पराभवाच्या भितीने भाजपकडून हे पाप होत आहे. हे सर्व षडयंत्र फडणवीस राबवत आहे. फॉर्म ७ मार्फत आमचे मतदार कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. याबाबत निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
.
