मलकापूर, दि 11,12 ऑक्टोबर नळगंगा धरण विसर्ग व अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुटुंबांचे नुकसान झाले. मात्र, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी खऱ्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे न करता 1500 जणांच्या नावावर सानुग्रह अनुदानाची रक्कम वितरित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आज ॲड. शोएब शेख यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि भ्रष्टाचारामुळे पूरग्रस्त कुटुंबांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी संगनमत करून अनेक अपात्र व्यक्तींना अनुदान वाटप केले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. खऱ्या लाभार्थ्यांना मात्र मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
ॲड. शोएब शेख यांनी सांगितले की, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनमानीने पंचनामे न करता लाभार्थ्यांची बनावट यादी तयार केली आणि अपात्र घरांमध्येही अनुदानाची रक्कम जमा केली. यामुळे खऱ्या पूरग्रस्तांवर अन्याय झाला असून, नुकसानग्रस्त कुटुंबं आजही अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या अभावात आहेत. मौजे दाताळा येथे जसे धान्य वितरण करण्यात आले, त्याच धर्तीवर मलकापूरमधील पूरग्रस्तांनाही तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शंभर ते दीडशे नागरिक, महिला आणि वृद्धांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गर्दी करून प्रशासनाच्या अनास्थेचा तीव्र निषेध केला.
ॲड. शोएब शेख यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर 2 दिवसांत खऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ देण्यात आला नाही, तर 23 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर कठोर चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे व गैरव्यवहाराची संपूर्ण चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. प्रकरणाची दखल घेऊन तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
