मलकापूर ( मुख्य संपादक ) मलकापूर शहरासह परिसरात अवैध वाहतुकीने मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहे. अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यापेक्षा वाहतूक पोलीस हे शहरातील रस्त्यांवर फिरून पोटापाण्यासाठी कष्ट करणार्या ऑटोचालक यांनाच वेठीस धरीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारीत आहेत. तसेच दुचाकीधारकांना सुध्दा एैनवैâन प्रकारे वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई करीत आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक व वाहतूक नियमांची अवहेलना होत असतांनाही त्याकडे मात्र या वाहतूक पोलिसांकडून जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड आता सर्वसामान्यांमधून समोर येवू लागली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात नेहमीच मुख्य मार्गांवर वर्दळ असते. बर्याचवेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. मात्र अशावेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी असणे गरजेचे असते, मात्र वाहतूक पोलीस हे त्यांच्या नेमणुकीच्या जागेवर न थांबता इतरत्रच एकत्रितपणे फिरून योग्य सावजाच्या शोधात असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी ही शहरात नेहमीचाच प्रश्न झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक खेडोपाडी तसेच मलकापूर नांदुरा, मलकापूर बुलढाणा, मलकापूर ते मुक्ताईनगर यासह आदी गावांकरीता मोठ्या प्रमाणात शहरातून विविध वाहनांच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. मात्र या अवैध प्रवासी वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांकडून कोणत्या कारणामुळे दुर्लक्ष केले जात आहे, याचीच सर्वत्र चर्चा आहे. तसेच शहरात मुख्य रस्ता असलेल्या बुलढाणा रोडवर सायंकाळ दरम्यान खासगी ट्रॅव्हल्स ह्या मोठ्या प्रमाणात रस्त्यातच उभ्या असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच अपघात घडण्याची शक्यता असतांनाही त्याकडेही वाहतूक पोलीस मात्र दुर्लक्ष करीत आहे.
शहरात वाहतूक पोलिसांना वेगवेगळ्या चौकांमध्ये नेमणूक देण्यात येते. मात्र त्याठिकाणी काही वाहतूक पोलीस नियमानुसार आपले कर्तव्य बजावतात तर काही वाहतूक पोलीस आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी न थांबता इतर सहकार्यांसोबत शहरातील इतर मार्गावर फिरून ड्युटी करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणावर ते हजरच राहत नसल्याने वाहतुकीचा नेहमीच गोंधळ निर्माण होतो.
वाहतूक पोलिसांचे कर्तव्य हे वाहतूक सुरळीत ठेवणे व वाहन धारकांना वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे हे आहे. परंतु शहरात अनेक वाहतूक पोलीस हे आपल्या कर्तव्याला विसरल्यागत कामे करीत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ऑटो चालवून करणार्या ऑटोचालकांना टार्गेट करीत त्यांची वाहने चलान करणे तसेच वेगवेगळ्या नियमांची जंत्री दाखवित त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे एकीकडे दिवसभरात २०० ते ४०० रूपये कमाई करणार्या त्या ऑटोचालकांना नाहक वाहतूक पोलिसांच्या या दंडात्मक कारवाईचा फटका सहन करावा लागत असल्यामुळे अनेक ऑटोचालकांचे परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.
वाहतूक पोलिसांनी आपले कार्य नियमानुसार करावे, आणि ते करीतही असतील. परंतु काही वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे तसेच एखाद्याप्रती असलेल्या द्वेषभावनेतून होणारी कारवाई ही एकप्रकारे वाहतूक पोलिसांना बदनाम करणारी व पोलिसांच्या प्रती जनतेच्या मनात रोष निर्माण करणारी ठरू शकते. तेव्हा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी योग्य ती पावले उचलून तशाप्रकारचे कार्य करणार्या वाहतूक पोलिसांना समज द्यावी, अशीही मागणी सर्वसामान्य जनतेमधून होतआहे.
