मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे सध्याच्या १०० के.व्ही. क्षमतेच्या डी.पी. ओव्हरलोड झाल्या असून, त्यामुळे वारंवार व्होल्टेज ड्रॉप, अस्थिर वीजपुरवठा, आणि वीज उपकरणांचे नुकसान यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. याचा परिणाम थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि सुरक्षेवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेऊन नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर स्पष्टपणे मांडल्या आहेत. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद जाधव, शहर कार्याध्यक्ष ॲड. शोएब शेख, तसेच अहेफाझ ठेकेदार, शिवाजी घुले, नझम रशेदी, फैयाज सर, सलीम चव्हाण, श्रावण वाघ यांच्यासह अनेक भागांतील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे भेट देत लेखी स्वरूपात समस्या सांगितल्या.
नागरिकांनी मागणी केली आहे की, सध्याच्या ओव्हरलोड डी.पी. १०० के.व्ही. वरून २०० के.व्ही. क्षमतेच्या करण्यात याव्यात आणि शहरातील विविध भागांमध्ये वाढत्या मागणीनुसार नवीन डी.पी. बसवाव्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला तातडीने कार्यवाहीसाठी आग्रह धरला असून, नागरिकांमध्ये संताप वाढत असल्याचेही अधोरेखित केले आहे. वीज ही मूलभूत गरज आहे, ती नियमित व सुरळीत मिळावी, यासाठी पक्षाचे पदाधिकारी पुढील काळात अधिक ठोस भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळाले आह.
