प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापुर :- बुलढाणा येथे भाजप सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा 2024 हा संपूर्णपणे लोकशाही व संविधानाच्या विरोधातला कायदा असून, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. या कायद्यानुसार शासनाला मनमानी अधिकार मिळत असून, कुठल्याही व्यक्तीला कारणाशिवाय अटक करणे, विरोधी आवाज दडपणे आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे शक्य होणार आहे. जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली शासन लोकशाहीला गळा घालण्याचा प्रयत्न करत आहे.
आज बुलढाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. शशिकांतजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत या कायद्याच्या विरोधात बुलंद घोषणांसह तीव्र निदर्शने करण्यात आली.
निदर्शनादरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “जनसुरक्षा कायदा रद्द करा”, “लोकशाही बचाव करा”, “जनतेच्या हक्कांवर गदा आम्हाला मान्य नाही” अशा घोषणांनी बुलढाणा शहरात वातावरण प्रक्षुब्ध केले.
महाविकास आघाडीने जनतेच्या न्याय व अधिकारांसाठी सुरू केलेला हा लढा पुढेही सुरू राहणार असून, शेतकरी, कामगार, युवक, महिला, व्यापारी अशा सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे संघर्ष करत राहू, असा ठाम निर्धार या निदर्शनांतून व्यक्त करण्यात आला.
