मलकापूर (प्रतिनिधी):
स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला. या वर्षीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण मानल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हांस्ड २०२६परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत विद्यार्थी तनय प्रदीप टेकाडे याने ओबीसी रँक १२० ओजस ज्ञानदेव कोलते याने ओबीसी रँक ३४०आणि पियुष नारायण फाळके याने ओबीसी रँक ४४२प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने मलकापूर शहरासह संपूर्ण परिसराचे नाव देशभरात उंचावले आहे. अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा सूर याप्रसंगी उमटला.
या अभिमानास्पद यशाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे , उपप्राचार्य प्रा. संदीप खाचणे आणि आयक्यूएसी डीन प्रा. रमाकांत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी ठरलेल्या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन जाहीर गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण परिसर आणि शैक्षणिक क्षेत्रातून या यशस्वी विद्यार्थ्यांवर व त्यांच्या पालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

