मलकापुर:- मलकापूर व खामगाव दिव्यांग तपासणी संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत कलीम शेख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.दत्तात्रय बिराजदार सामान्य रुग्णालय बुलढाणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सादर केले.
निवेदनात मलकापूर येथील दिव्यांग बोर्ड तपासणी शिबिरा संदर्भात येणाऱ्या अडचणी तसेच रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणारे लिपिक तायडे हे दिव्यांगांप्रती सहकार्याची वागणूक न देता वारंवार चकरा मारण्याची वेळ आणतात व वेगवेगळी कारणे व त्रृटी दाखवून प्रमाणपत्र प्रलंबित ठेवतात.
तसेच उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील वैद्यकीय अधीक्षक राजेश उंबरकर यांचे आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण दिसत नाही. ते स्वतः कार्यालयात आठवड्यातून दोन ते तीन दिवस हजर असतात. त्या परिणामी दिव्यांग तपासणी बोर्डाच्या दिवशी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर उशिरा, 10 वाजण्याऐवजी 11 वाजता येऊन लवकर निघून जातात आणि ओपीडीची चिठ्ठी काढण्यासाठी खिडकी 12 वाजताच बंद होते आणि तपासणीला येणारे दिव्यांग ओपीडी चिठ्ठीसाठी वणवण फिरतात.
बुलढाण्यातून येणारे तज्ञ डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांना दिव्यांग तपासणीसाठी
रूम व खुर्ची सुद्धा उपलब्ध नसून त्यांना स्वतः खुर्ची शोधून आणावी लागते . तज्ञ डॉक्टरांना बसण्यासाठी रूम व खुर्ची उपलब्ध होत नाही. मागील ऑगस्ट महिन्यात 12 तारखेनंतर तीन बुधवार (आठवडे)बोर्ड झाले नाही, तर बोर्डाचे अध्यक्ष व सदस्य व कर्मचाऱ्यांनी साधे सूचनाफलक देखील लावले नाही आणि तपासणी करिता येणाऱ्या दिव्यांगांना आर्थिक व शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला.
या सर्व बाबींची प्रचिती मलकापूर येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर व त्यांचे सहकारी वाहतूक सेना प्रमुख इमरान लकी यांनी प्रत्यक्ष वारंवार खातरजमा करून स्वतः पुढाकार घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बिराजदार यांचे समक्ष चर्चा करते वेळी तक्रारीचे वाचन करून निवेदन कर्त्यास सहकार्य केले. सदर निवेदनाची जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्याचबरोबर खामगाव सामान्य रुग्णालयात येणाऱ्या अडचणी बाबत अपंग जनता दल संघटनेच्या मागणीनुसार दिव्यांगांना विनात्रास दिव्यांग प्रमाणपत्रावरील नावातील दुरुस्ती, जन्म तारीख दुरुस्ती करण्याकरिता 15 मे 2026 च्या पत्रानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आदेशित केले असतांना व नंतर दूरध्वनीवर सुद्धा आदेशित केले असतांना आजही खामगाव सामान्य रुग्णालयाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसून सामान्य रुग्णालय खामगाव येथील कार्यरत दिव्यांग प्रमाणपत्र हाताळणाऱ्या विभागाकडून दिव्यांगांना अत्यंत त्रास दिला जात असून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर व आवश्यक पुरावे जोडून सुद्धा संबंधित विभागाने Approval देणे अपेक्षित असतांना तशा प्रकारची कार्यवाही होत नाही.
प्रमाणपत्रातील दुरुस्त्यांकरिता सर्व कागदपत्रे ऑनलाईन सादर केल्यानंतर सुद्धा हस्तलिखित अर्जाचा आग्रह, दिव्यांग स्वतः हजर, आधारकार्ड, जन्म दाखला, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांच्या Hard Copy मागण्यात येतात, तदनंतर त्यांना तासनतास बसवून ठेवण्यात येते. करिता या सर्व त्रासदायक बाबी घडतात. ज्या अर्थी वेबसाईटवर अर्ज करून नावातील दुरुस्तीकरिता पुराव्यादाखल कागदपत्रे सादर केली जातात, त्यामुळे वेगळ्याने हस्तलिखित अर्जाची आवश्यकता नाही, असे संघटनेचे मत आहे. परंतु सामान्य रुग्णालय खामगाव येथे ही बाब दिव्यांगांकरिता त्रासदायक आहे.
संजय गांधी योजने अंतर्गत DBT द्वारे संबंधित लाभार्थ्यांना अनुदान खात्यात प्राप्त होत असून दिव्यांग प्रमाणपत्र व आधारकार्ड यामध्ये थोडाही बदल असल्यास अनुदान बंद करण्यात येते. अशा अनेक दिव्यांगांचे अनुदान बंद झालेले असून ऑनलाईन करून सुद्धा प्रमाणपत्रातील दुरुस्त्या वेळीच न झाल्याने दिव्यांग व्यक्ती कित्येक महिन्यापासून निराधार योजनेच्या अनुदानापासून आजही वंचित आहे.
कलीम शेख यांनी चर्चा करतेवेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांना सांगितले की, एकवेळ ऑनलाईन अर्ज केल्यानंतर वेगळ्याने कागदपत्रे,अर्जाची मागणी करण्यात येऊ नये.
त्याचबरोबर खामगाव सामान्य रुग्णालयात अनेक दिवसांपासून दिव्यांग तपासणी बोर्ड कार्यरत असल्यामुळे शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मोताळा तसेच ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव प्रमाणपत्रासाठी येत आहेत. खामगाव येथे तपासणी बोर्डात अस्थिरोग तज्ञ, नेत्रतज्ञ, कान-नाक-घसाचे डॉक्टर तपासणीसाठी दर बुधवारला उपलब्ध असतात. मात्र मानसिक रोग तज्ञ डॉक्टर महिन्यातून केवळ दोनच आठवड्यात उपलब्ध असल्यामुळे मनोरुग्ण, मतिमंद तसेच मानसिक स्वरूपाचे दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना तपासणी पूर्ण न झाल्याने परत जावे लागत आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांग बांधवांना वारंवार प्रवास करणे आर्थिक व शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मानसिक रोग तज्ञ डॉक्टर दर बुधवारी खामगाव दिव्यांग तपासणी बोर्डात उपलब्ध करून देण्यात यावेत, जेणेकरून मानसिक स्वरूपाच्या दिव्यांगत्वाची तपासणी त्याच दिवशी पूर्ण होऊन संबंधित लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही.
