अल्पसंख्यांक सेवा संघटनेचा सामाजिक उपक्रम; लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण
जळगाव : शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले थोर स्वातंत्र्ययोद्धे शेर-ए-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अल्पसंख्यांक सेवा संघटनेच्या वतीने शाहूनगर येथे मिठाईवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, युवक आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हजरत टिपू सुलतान हे भारतीय इतिहासातील एक पराक्रमी आणि शूरवीर शासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी म्हैसूरच्या राज्याचे नेतृत्व करताना ब्रिटिश सत्तेविरुद्ध धैर्याने लढा दिला. स्वाभिमान, मातृभूमीवरील प्रेम आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने जयंतीनिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर अहमद खान आणि प्रदेश उपाध्यक्ष याकूब दाऊद खान, जुबेर भाई खाटीक,तन्वीर शेख, तन्वीर खाटीक यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. मिठाई मिळाल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता. उपस्थित नागरिक, युवक आणि बालकांनीही या कार्यक्रमात सहभागी होत आनंदाने मिठाईचा आस्वाद घेतला.
महापुरुषांच्या जयंती केवळ उत्सवापुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचा, शौर्याचा, सामाजिक एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याच सामाजिक बांधिलकीतून अल्पसंख्यांक सेवा संघटनेने हा उपक्रम राबिविले 🙏
