_आंतरराष्ट्रीय उर्दू दिवस आणि मोहम्मद इकबाल जन्मदिनाच्या निमित्ताने_*"उर्दूतील सहिष्णूता व राष्ट्रवादाची संकल्पना आणि उर्दूला जपण्याची गरज"*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

---------------------------------------------

उर्दू ही भाषा भारतीय आहे. निदान स्वातंत्र्यपूर्वकाळात तरी त्याला आजच्या सारखी एकारलेली धार्मिक ओळख मिळालेली नव्हती. भारतातील सर्व घटकांनी या भाषेला आपले मानले होते, असेही म्हणता येणार नाही. कारण स्वातंत्र्यपुर्वकाळात उर्दूमध्ये झालेल्या साहित्यनिर्मितीत 70 टक्के वाटा हा मुस्लिम साहित्यीकांचा आहे. मुस्लिम साहित्यीकांची संख्या एकास तीन इतकी आधिक असतानाही मुस्लिमेतर साहित्यीकांना या भाषेत साहित्यनिर्मिती करताना कसल्याच उपरेपणाची जाणीव झाल्याच्या नोंदी आढळत नाहीत. (निदान स्वातंत्र्यपुर्वकाळात तरी तश्या नोंदी नाहीत.) त्याची कारणे शोधू पाहता, तीन महत्वाच्या मुद्यांना अधोरेखित करता येईल. 

१) उर्दूतील मुस्लीम साहित्यीकांचे वर्तन हे भाषीक बहुसंख्यांकासारखे राहिले नाही. त्यांच्या साहित्यातून मुस्लिमेतरांवर विखारी टिका झालीच नाही, असे म्हणता येणार नाही. पण त्याचे प्रमाण दखल घेण्याईतके लक्षवेधी कधीच नव्हते. याउलट हिंदू मुस्लिम ऐक्याच्या, गंगा-जमनी विचारांच्या आणि संमिश्र राष्ट्रवादाच्या कविता उर्दूत अक्षरशः हजारोंच्या संख्येने लिहील्या गेल्या आहेत. उर्दूतला इतिहासविचार हा इस्लामप्रणित इतिहासलेखनावर आधारीत होता. तेथे मुस्लिमांच्या श्रध्देचा मुद्दा केंद्रस्थानी होता, हे मान्य करावे लागेल. पण त्यातूनही इतरांवर हिनत्व लादण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत. मुन्शी जकाउल्लाह, सर सय्यद या इतिहासकारांनी इतिहासलेखाविषयी मांडलेली भूमिका यासंदर्भात अभ्यासता येईल. 

२) त्याकाळात भारतातील मुस्लिमांकडे पाहण्याची राजकीय बहुसंख्यांकाची दृष्टी इतकी विखारी नव्हती. उर्दूतला राष्ट्रवादाचा विचार देखील त्यासाठी कारणीभूत असेल. सारे जहांसे अच्छा हे एकच गीत आज आपल्याला आठवते. पण भारताच्या गौरवाचे कसिदे लिहीणाऱ्या उर्दू कवींची संख्या मोठी आहे. स्वातंत्र्यपुर्वकाळातील उर्दू पत्रकारीता देखील यासाठी कारणीभूत असावी. आजची उर्दू पत्रकारीता मुस्लिमांसाठीचा पत्रकारीतेतला दबावगट म्हणून कार्य करत असली तरी त्यावेळी मात्र आजच्या सारखी परिस्थिती नव्हती. ऊर्दू पत्रकारीता त्याकाळी भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षात आघाडीवर होती. प्रशासकीय व्यवहारातील उर्दूचा वापरही तेंव्हा मोठा होता. अनेक संस्थानातील उर्दूचा वापरही यासाठी कारणीभूत असेल. 

३) उर्दूतल्या कथा, कांदबऱ्यांमध्येही हिंदू पात्रांचे चित्रण मुस्लिमांच्या समान पातळीवर झाले आहे. किंबहूना धार्मिक बंधुत्वाचा विचार या कांदबऱ्यांमध्ये इतर भाषेतील कादंबऱ्यांपेक्षा आधिक आहे. उर्दूतला भाषांततरीत साहित्याचा इतिहासही यासाठी कारणीभूत आहे. कुरआनचे मुस्लिमेतरांनी किती भाषांमध्ये भाषांतर केले याची माहिती शोधू पाहता खूप निराशाजनक माहिती हाती लागते. याउलट उर्दूत भाषांतरीत झालेल्या रामायण, वेद, महाभारत आणि अन्य धार्मिक ग्रंथांचा इतिहास खूप जुना आहे. उर्दूमध्ये रामायणाचे भाषांतर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये झाले आहे. रामायण आणि महाभारतावरील कथांची संख्याही जास्त आहे. (मराठीत इस्लामी इतिहासावरील कांदबऱ्या अथवा कथा नगण्य आहेत.) प्रगतीशील लेखक संघाची चळवळ (तरक्कीपसंद मुसन्नीफैन) उर्दू साहित्यविश्वातून समोर आली. इतर भाषांपेक्षा विद्रोही, प्रागतीक विचारवंत, साहित्यीकांची संख्या स्वातंत्र्यपुर्वकाळात इतर भाषांच्या तुलनेत उर्दूमध्ये आधिक होती. 

आज निर्माण झालेला राष्ट्रवादाचा बहुसंख्यांकांच्या अस्मितांवर आधारीत राजकीय विचार उर्दूच्या मुळावर उठला आहे. उर्दूची कबर खोदण्यासाठी आसुसलेल्या राजकारण्यांकडून आपल्याच इतिहासाचा एक समृध्द वारसा दफन करण्याची तयारी केली जातेय. उर्दू भाषा का महत्वाची आहे. याविषयी आणखी काही मुद्दे आपण पुढच्या भागात विचारात घेऊयात. 

धन्यवाद.

सरफराज अहमद,
सोलापूर

०९/१०/२२

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)