नांदुरा ■ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या गौण खनिज वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्पर वर नांदुरा पोलिसांच्या गस्ती पथकाने कारवाई करुन १४ लक्ष १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांविरुद्ध गौण खनिज अधिनियमान्वये गुन्हे नोंद करण्यात आल्याची घटना ११ डिसेंबर च्या रात्री ११.३० वाजेदरम्यान वडनेर (भोलजी) ते चांदुर बिस्वा दरम्यान असणाऱ्या डिघी फाट्यावरील महावितरणच्या सब स्टेशन नजीक घडली.
याबाबत सरकार पक्षाच्या वतीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नापोकॉ राहुल ससाणे यांनी नांदुरा पो.स्टे. दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की पोलीस स्टेशनच्या हद्दीत इतर सहकाऱ्यांसह रात्रीची गस्त करीत असतांना डिघी फाट्याजवळ एम एच - २८ - बीबी - ५०८१ व एक विनाक्रमांकाचे टिप्पर ज्यामध्ये ४ ब्रास वाळू असा एकूण किं १४,१८००० रुपयांच्या गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले.
याप्रकरणी नांदुरा पोलीसांनी दोन्ही टिप्पर जप्त करीत भारत पंडीत सपकाळ वय ४१ वर्षे रा दाताळा ता मलकापूर व अमरसिंह राजपालसिंह राजपूत वय ४५ वर्षे रा. निंबारी ता मलकापूर या दोघा आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९, सहकलम २१ (१), (२) गौण खनिज अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या वाळुतस्करी प्रकरणाचा पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे...

