जळगावची विमानसेवा फेब्रुवारीपासून पूर्ववत ! ललित गांधी : चार रेल्वेगाड्यांना मिळणार थांबे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



जळगाव : जळगावच्या विमानतळावर रात्रपाळीलाही विमानसेवा देणारी यंत्रणा सज्ज आहे. तरीही ही सेवा बंद असल्याने औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जळगाव स्थानकावर पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबे द्यावेत आणि विमानसेवा तत्काळ सुरू करावी यादृष्टीने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 'स्टार एअर'च्या माध्यमातून येत्या फेब्रुवारीपासून मुंबई, अहमदाबाद इंदौर व पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी गुरुवारी येथे दिली.


राज्यातील ३६ जिल्ह्यात उद्योग व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय व शेत उत्पादनांची बाजारपेठ विस्ताराव. आणि त्यांना व्यासपीठ मिळावे, यासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने जिल्हानिहाय आढावा घेतला जात आहे. त्यानिमित्ताने गांधी हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी प्रतिनिधींची त्यांनी गुरुवारी बैठक घेतली. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील, समितीचे सदस्य दिलीप गांधी, नितीन इंगळे यावेळी उपस्थित होते.



महिला व युवकांसाठी अभियान

महिला व युवकांना उद्योग, व्यावसायिक क्षेत्रात आणण्यासाठी राज्यभरात महिला उद्योजकता अभियान व उद्योग वृद्धी यात्रा अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच राज्यात जिल्हानिहाय 'डेव्हलपमेंट फोरम'चे कार्यालय स्थापन करून उद्योग वाढीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. हा एकत्रित आडावा राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.



पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वेगाड्या

पुण्याकडे जाण्यासाठी जळगाव येथे थांबा असणाच्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी आहे.. त्यामुळे अन्य गाड्यांनाही थांबा मिळावा, यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने पाठपुरावा केला. त्यानुसार दुरांतो, गरीबरथ, दाणापूर-पुणे व हमसफर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना लवकरच जळगाव स्थानकावर थांबा मिळणार आहे.


'स्टार एअर' देणार सेवा


जळगाव विमानतळावरून सेवा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत गेल्या आठवड्यात बैठक झाली. जळगावच्या औद्योगिक विकासात बंद विमानसेवा मोठा अडसर ठरत असल्याची बाब या बैठकीत मांडण्यात आली. त्यानंतर 'स्टार एअर' कंपनीकरवी जळगावहून विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. या कंपनीतर्फे बिझनेस क्लासची सेवाही उपलब्ध आहे. ८० जणांची आसन व्यवस्था असलेली ही कंपनी मुंबई, अहमदाबाद, पुणे व इंदौर येथे सेवा सुरु करणार आहे. या कंपनीने होकारही दिला असल्याचे गांधी यांनी सांगितले. गुरुवारी, विमानतळ विभागाचे संचालक व जिल्हाधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठकही झाल्याचे त्यांनी सांगितले.


'ई-कॉमर्स कंपन्यांमुळे ३० टक्के व्यवसाय बंद

    'ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या मार्गाने व्यवसाय सुरु ठेवला आहे. सुरुवातीला ग्राहकांना कमी दरात उत्पादने उपलब्ध करून द्यायची आणि ग्राहकांना जोडून ठेवायचे यासाठी 'ई-कॉमर्स कंपन्या चुकीचा मार्ग अवलंब करत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. 'ई-कॉमर्स कंपन्यांच्या या धोरणामुळे राज्यातील ३० टक्के व्यावसायिकांचे धंदे बंद पडले आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांनी कमावलेला नफा विदेशात जात असल्याची बाबही केंद्राच्या निदर्शनास आणून दिली आहे. पर्याय म्हणून विक्रेत्यांना, व्यावसायिकांना कार्ड देऊन डिजिटल पोर्टल उभारण्यात येत आहे. त्यातून हा घटक एकत्र येईल आणि स्पर्धेत यशस्वी ठरेल, यादृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या तीन पिकांच्या उत्पादकांसाठी व्यासपीठ उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)