अपघातात जळगाव जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये चिंताजनक : वर्षभरात ५२५ अपघात

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


 जळगाव : राज्यात रस्ते अपघातांची सर्वाधिक नोंद असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असून, सन २०२१ मध्ये दिवसाला दीड याप्रमाणे वर्षभरात ५२५ अपघात जळगाव जिल्ह्यात झाले आहेत. त्यानंतरदेखील ही आकडेवारी वाढतच आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. वाढत्या अपघाताच्या घटनांबद्दल आणि वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळले नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

    जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीतर्फे रविवारी, स्कूल बसचालक व सहवर्तीयांची रस्ता सुरक्षा कार्यशाळा झाली. यावेळी श्याम लोही बोलत होते. जिल्ह्यात सन २०२० मध्ये ४६४, २०२१ मध्ये ५२५ रस्ते अपघात झाले आहेत. २०२२ वर्षातील डिसेंबर अखेरची अंतिम आकडेवारी अद्याप येणे बाकी आहे, पण रस्ते अपघातांची संख्या ५५० पेक्षा जास्त आहे. यातील ७० टक्के अपघात है दुचाकींचे व हेल्मेट न घालणाऱ्यांचे आहेत. लोकांनी गांभीर्याने वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असेही श्याम लोही म्हणाले.

महिलांनीही काळजी घ्यावी

बाईकवर एकाच बाजूने बसल्यास बॅलन्स होत नाही, अशा स्थितीत वाहन हायवेवरून चालवणे चालकासाठी धोकादायक असते. त्यामुळे मागील सीटवर बसताना दोनही बाजूने पाय टाकून बसा. महिलांनी दुचाकी चालवताना उंच टाचांच्या चपला वापरू नयेत. पाय टेकवताना अचानक टाच निघाल्यास बॅलन्स जाऊन वाहनाचा अपघात होऊ शकतो. हा धोकाही महिलांनी लक्षात घ्यावा, असे आवाहन श्याम लोही यांनी सांगितले.


'जीवनदूत' व्हा, पारितोषिक मिळवा

अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात नेऊन त्यांचा जीव वाचविणाऱ्या व्यक्तींना शासनाकडून ५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते. अशांना जीवनदूत म्हटले जाते. त्यांनी अपघातग्रस्ताला रुग्णालयात भरती केल्यावर केवळ त्यांचे नाव व संपर्क क्रमांक पोलिसांनी नोंदवून घेणे अपेक्षित आहे. यापेक्षा अधिकची चौकशी ते त्यावेळी करू शकत नाहीत.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)