अपघातातून वाचलो अन् रविकांत तुपकरांमुळे कुटुंबा पर्यंत पोहचलो संतोष अरसोड, (नेर जि.यवतमाळ)

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग लागली. ही बातमी सर्वत्र पोहोचून मदत पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती व त्यातील ३५-३६ पैकी २५ प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले होते. शनिवारचा दिवस या भयानक अपघाताच्या बातम्या येत राहिल्या. मात्र आपल्या जनसेवेसाठी ओळख असलेले बुलढाणा जिल्ह्यातले नेते रविकांत तुपकर यांनी दाखवलेल्या माणुसकीची ह्रदयस्पर्शी कहाणी ऐकून अंगावर काटा आला. 

मध्यरात्री ही बस धडाधड पेटत असताना आयुष घाडगे नावाचा मुलगा बसच्या मागची आपत्कालीन खिडकीची काच फोडून बाहेर पडला. या प्रयत्नात त्याला बर्‍याच जखमा झाल्या पण तो सुखरुप बाहेर पडला. सुदैवाने मागून येत असलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये त्याचे तीन मित्र होते. त्यांनी तातडीने त्याला औरंगाबादला उपचारासाठी नेले. इथे पंचनामा सुरू झाला मात्र आग एवढी भयंकर होती की मृतदेहांची ओळख पटणे फार अवघड होते. त्यामुळे प्रवाशांच्या यादीप्रमाणे आयुषलाही आधी मृत घोषित करण्यात आले. नंतर प्रक्रियेप्रमाणे पोलिसांनी त्याला देऊळगावराजा येथील ग्रामीण रुग्णालयात बोलावून घेतले व त्याच्यावर उपचार करण्यात आले. या आगीत त्याची बॅग, सगळी कागदपत्रे जळून गेल्याने त्याच्याजवळ ओळखपत्र नव्हते. त्याला यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथे जायचे होते पण आता जवळ पैसेही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याने वारंवार मदतीची याचना करूनही प्रशासनाने याबाबतीत त्याची कोणतीच दखल घेतली नाही. रुग्णालयातून सुटी झाल्यावर तो एक-दीड तास तिथेच हताश होऊन बसून राहिला. 

दरम्यान बुलढाण्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर हे ग्रामीण रुग्णालयात जखमींना भेट देत असताना त्यांना आयुषची आपबिती समजली. त्यांनी सगळ्यात आधी आपल्या फोनवरून आयुषच्या वडिलांना फोन करून तो सुखरूप असल्याची आनंदवार्ता दिली. त्यानंतर त्याची व त्याच्या मित्रांची जेवणाची सोय केली. तुपकर यांनी स्वतः जवळचे पैसे आयुषला देत भाड्याने गाडी घेऊन त्याला त्याच्या गंतव्य स्थानी जाण्याची व्यवस्था केली.

आगीच्या काळ्याकुट्ट लोळात माणुसकीचा हा प्रकाश लख्ख चमकला. आकस्मिकपणे आलेल्या या कठीण परिस्थितीत आयुष जेव्हा भांबावला, खचून गेला तेव्हा रविकांत तुपकरांनी कसलाही विचार न करता आपल्या उपजत सेवागुणाचा प्रत्यय दिला. आज दिवसभर या अपघाताच्या येत असलेल्या नकारात्मक बातम्यांमध्येच ही सकारात्मक घटना व रविकांत तुपकर यांचे माणुसकीदर्शन आश्वस्त करणारे आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)