मलकापूर :
शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण बळकटीकरणासाठी शिक्षक संघटनांची भूमिका अत्यंत मोलाची असून गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित व संशोधनाभिमुख तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, जबाबदार आणि समाजाभिमुख अभियंते घडवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार किरण सरनाईक (अमरावती विभाग शिक्षक संघ) यांनी केले. ते पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते.या सदिच्छा भेटीप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार किरण सरनाईक यांचा औपचारिक महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील व सत्कार प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना आमदार किरण सरनाईक यांनी तांत्रिक शिक्षणातील गुणवत्ता, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, मूल्याधिष्ठित शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर सविस्तर भाष्य केले. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोन्मेष, स्टार्टअप संस्कृती, कौशल्यविकास व सामाजिक जाणीव यांचा समतोल साधावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या सदिच्छा भेटीच्या अनुषंगाने आमदार किरण सरनाईक यांनी महाविद्यालयातील विविध अत्याधुनिक प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील शैक्षणिक सुविधा, उपकरणे, संशोधनात्मक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. प्रयोगशाळांमधील अद्ययावत यंत्रसामग्री, उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती व संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रकल्पांविषयी, शैक्षणिक वाटचालीविषयी तसेच भविष्यातील उद्दिष्टांविषयी त्यांनी चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील एफडीपी, संशोधन प्रकाशने, सामाजिक उपक्रम, कौशल्यविकास कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटविषयक उपक्रमांची माहिती आमदार किरण सरनाईक यांना दिली. महाविद्यालय ग्रामीण भागात असूनही गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना आमदार किरण सरनाईक यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने सकारात्मक कार्य करण्याचे आवाहन केले. सर्व मान्यवरांनी आमदार किरण सरनाईक यांच्या सदिच्छा भेटीचे मनःपूर्वक स्वागत करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व सामाजिक कार्याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सदाशिव लवंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व विभागांनी मोलाचे सहकार्य केले.


