पत्रकार समाजाचा आरसा: गजानन घोंगडे धामणगाव बढे येथे 'पत्रकार दिना'निमित्त पत्रकारांचा गौरव धामणगाव बढे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



"पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून वर्षभर जनतेला न्याय मिळवून देण्याचे निस्वार्थ कार्य करतात. पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत, जे सत्य समोर आणण्याचे धाडस दाखवतात. अशा सजग प्रहरांचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे," असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते गजानन घोंगडे यांनी केले.

'मराठी पत्रकारितेचे जनक' दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून धामणगाव बढे येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये गजानन घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवि काका मोदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून धामणगाव बढेचे ठाणेदार नागेश जायले उपस्थित होते. यावेळी बाळू काका मोदे, धनराज महाजन, लक्ष्मण गवई, एस.पी. अहिरे यांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुभाष किन्होलकर सर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनसंघर्षावर आणि पत्रकारितेतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. ठाणेदार नागेश जायले यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, "पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही घटक समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि जनजागृतीसाठी एकत्र काम करतात."

अध्यक्षीय भाषणात रवि काका मोदे यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आणि कठीण परिस्थितीतही पत्रकारितेची मशाल तेवत ठेवणे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी नवीन मोदे, धनराज महाजन आणि इतर मान्यवरांनीही आपली मते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन घोंगडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कडूबा इंगळे यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार,  गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)