पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात 'उद्योजकता जागृती' कार्यशाळा उत्साहात संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



मलकापूर : येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग व मेकॅनिकल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘उद्योजकता जागृती’ कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मागील आठवड्यात पार पडलेल्या या कार्यशाळेस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय तसेच इंडो-जर्मन टूल रूम, छत्रपती संभाजीनगर यांचे प्रायोजकत्व लाभले होते. या कार्यक्रमात एकूण १४० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून उद्योजकतेविषयीची आपली जिज्ञासा आणि उत्सुकता दर्शविली. कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सी.बी.एफ.सी. लिमिटेडचे संचालक श्री. राजेश चंचलानी यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणी, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन तसेच उद्योगातील संधी व आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित उदाहरणे देत विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्याचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्त रूप देण्याचा संदेश दिला. तसेच इंडो-जर्मन टूल रूम, औरंगाबाद येथील ‘लो-कॉस्ट ऑटोमेशन’ विभागाचे प्रमुख श्री. अनिकेत बी. देशमुख यांनी कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग कसा विकसित करता येतो, याचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना तांत्रिक दृष्टिकोन दिला. सकाळी ९:३० ते सायंकाळी ४:३० या कालावधीत पार पडलेल्या या कार्यशाळेचे प्रभावी नियोजन कार्यक्रम समन्वयक प्रा. डी. पी. खरात आणि विभागप्रमुख प्रा. एस. आर. शेकोकार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेकॅनिकल विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबतची जाणीव अधिक दृढ झाली असून भविष्यात स्वतःचा उद्योग उभारण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आहे. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळून ते रोजगारनिर्माते बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलतील, असा विश्वास  प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, श्री. सुधीरभाऊ पाचपांडे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी यांनी व्यक्त केला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)