नियुक्त पदाधिकारी हे असमर्थ ठरत आहेत. शहरात साफसफाई, पिण्याच्या पाण्याची समस्या, अपंगांना देण्यात येणारा निधी, सेवानिवृत्त कर्मचार्यांचे प्रश्न, सफाई कामगारांच्या पगाराचा प्रश्न असे अनेक प्रश्न असतांनाही न.प. प्रशासनाचा कारभार नियोजनशून्य व वेळकाढू असाच आहे. या विरोधात आज १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात प्रहारच्या पदाधिकार्यांनी न.प. ईमारतीमध्ये घागर पुजून श्राध्द घालीत न.प. प्रशासनाचा निषेध नोंदविला
मलकापूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासन व निवडून आलेले पदाधिकारी हे अकार्यक्षम ठरत आहेत. शहरामध्ये साफसफाईचा बोजवारा उडाला असल्याने मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकीकडे साफसफाईच्या नावावर लाखो रूपये खर्च करण्यात येतात, मात्र शहरात कोठेही साफसफाई दिसत नाही. तसेच शहरामध्ये सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचाही बोजवारा उडालेला आहे. शहर वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी १५ दिवस वाट पहावी लागत आहे. केवळ न.प.च्या नियोजनशून्य कारभारामुळे शहर वासियांना नाहक विकत पाणी घ्यावे लागत आहे. दिव्यांग बांधवांकरीता ५ टक्के निधीचे वितरणही वेळेत होत नसल्याने दिव्यांग बांधवांना न.प.च्या चकरा माराव्या लागत आहे. त्याचप्रमाणे कंत्राटी साफसफाई कर्मचारी काम करतात परंतु गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून त्यांना पगारच देण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांनाही त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही न.प. प्रशासन व निवडून आलेल्या न.प.तील पदाधिकार्यांची असतांना देखील या जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. नियमानुसार न.प.तील अधिकारी व कर्मचार्यांचे बायोमेट्रीक हजेरी आवश्यक असतांना अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी अद्यापही आपले बायोमेट्रीक न करता रजिष्टरमध्येच हजेरी लावत आहेत. त्यामुळे अशा अधिकारी , कर्मचार्यांना ना वेळेचे भान न कामाची जबाबदारी असेच चित्र निर्माण झाले आहे.
आज चार महिने उलटून गेले असतांनाही शहरातील जनतेला कोणत्याही ठोस अशा मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला नाही. निवडणुकीवेळी अनेक आश्वासने देण्यात आली, मात्र ही आश्वासने आजरोजी हवेतच विरल्याचे दिसत आहे. अशा नियोजनशून्य कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्क न.प.च्या प्रशासकीय ईमारतीमध्येच अक्षयतृतीयेच्या दिवशी घागर पुजून श्राध्द घालीत न.प. प्रशासनाचा व न.प.तील सत्ताधारी व पदाधिकार्यांचा निषेध नोंदविला. तसेच एक महिन्याच्या आत शहर वासियांना आवश्यक त्या मुलभूत सुविधा न पुरविल्यास याहीपेक्षा तीव्र असे आंदोलन छेडू असा इशाराही उपस्थित पदाधिकार्यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, शहराध्यक्ष शालीकराम पाटील, तालुकाध्यक्ष राहुल तायडे, बलराम बावस्कर, दिव्यांग संघटनेचे निलेश चोपडे, नागेश सुरंगे, प्रहार दिव्यांग शहर प्रमुख अनिल गोठी, संजय इंगळे, करण नायसे यासह आदी उपस्थित होते.
चौकट
मलकापूर न.प. प्रशासन व निवडून आलेले पदाधिकारी हे शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरत आहेत. याबाबत अनेकदा निवेदने, तक्रारी करण्यात आल्यात. मात्र कोणतीही ठोस अशी उपाययोजना आजपर्यंतही झाली नाही. स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न यासह अनेक प्रश्न हे आ वासून उभे असतांनाही ते सोडविण्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या विरोधात आम्ही लवकरच न्यायालयात न.प.मध्ये स्थापन असलेली बॉडी बरखास्त करण्यासाठी याचिका दाखल करणार आहोत.
- अजय टप, जिल्हा उपप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष मलकापूर

