मलकापूर (प्रतिनिधी):
कर्नाटक राज्यातील मॅंगलोर येथील नीट्टे डिम्ड-टू-बी युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे, या शिबिरासाठी मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांची विद्यापीठाच्या वतीने 'चमू व्यवस्थापक' म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर विशेष कौतुक प्राप्त केले आहे.
हे राष्ट्रीय एकात्मता शिबिर एप्रिल महिन्यातआयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट विविध राज्यांमधील संस्कृतीचे आदानप्रदान करणे आणि युवकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जोपासणे हे होते. या शिबिरात भारतातील ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांसह एकूण २५ विविध राज्यांमधील संघांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. सात दिवस चाललेल्या या उपक्रमात सहभागी सर्व राज्यांनी आपापल्या पारंपारिक लोककला आणि संस्कृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या संघाने लावणी, वीररसयुक्त पोवाडा, कोळीगीते आणि विलोभनीय गणपती आराधना यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची झलक उपस्थितांना दाखवून दिली. या कामगिरीमुळे सर्व सहभागी राज्यांच्या संघांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे विशेष कौतुक करण्यात आले.
प्रा. सचिन बोरले यांनी चमू व्यवस्थापक म्हणून बजावलेल्या चोख भूमिकेबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे सर व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले असल्याचे प्रा. बोरले यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे आणि विद्यापीठाचे नाव उंचावल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रा. सचिन बोरले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. या यशाने जिल्ह्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

