नांदुरा, दि. 21 सप्टेंबर 2026 : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, तसेच शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळात नियमित पेट्रोलिंग करावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आजाद पठाण यांनी केली.
याबाबत नांदुरा पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सणांच्या काळात नागरिक, व्यापारी आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी संवेदनशील भागात विशेष गस्त, बाजारपेठांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तसेच संशयास्पद व्यक्ती व वाहनांची कायदेशीर तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
नागरिकांनी भीतीच्या वातावरणात नव्हे, तर सुरक्षित व निर्भय वातावरणात सण साजरे करावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या वेळी शेख नदिम, अझर मिर्झा, तोसीफ बिल्डर, आसीफ खान, मोहम्मद सलीम, शेख अजीम यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
