पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इन्फोसिस व एथनुसच्या सहकार्याने ३ दिवसीय रोजगार कौशल्य प्रशिक्षण पूर्ण!

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर: येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कॉर्पोरेट जगतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ३ दिवसीय 'एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ट्रेनिंग प्रोग्राम' अत्यंत उत्साहात संपन्न झाला. इन्फोसिस फाउंडेशनच्या सहकार्याने व एथनुस कन्सल्टन्सीच्या संयुक्त विद्यमाने या ३ दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील विविध शाखांमधील तब्बल १५० अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उद्योग क्षेत्रातील अद्ययावत कौशल्यांचे धडे घेतले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून कॉर्पोरेट क्षेत्रातील सॉफ्ट स्किल्स, संभाषण कौशल्य आणि व्यावसायिक वृत्ती हीच रोजगाराची खरी गुरुकिल्ली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कौशल्यांचा आपल्या करिअरमध्ये प्रभावीपणे वापर करावा. उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातर्फे अशाच नाविन्यपूर्ण व रोजगारभिमुख उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल असा विश्वास व्यक्त केला, तर आयक्यूएसी डीन प्रा. रमाकांत चौधरी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी आयक्यूएसी विभाग कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

बंगळुरू येथील एथनुस कन्सल्टन्सीच्या तज्ज्ञ प्रशिक्षिका प्रा. प्रवलिका वेलदे आणि प्रा. वर्षिता मल्यम यांनी विद्यार्थ्यांना तीन दिवसांत अत्यंत सोप्या व प्रात्यक्षिकांवर आधारित पद्धतीने मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी कॉर्पोरेट संभाषण कौशल्य आणि व्यावसायिक देहबोली, दुसऱ्या दिवशी प्रभावी रेझ्युमे तयार करणे व गटचर्चा, तर तिसऱ्या दिवशी मुलाखतीची तयारी, कॉर्पोरेट शिष्टाचार आणि ताणतणाव व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून मॉक इंटरव्यू व प्रत्यक्ष गटचर्चा करून घेऊन प्रशिक्षकांनी त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापिका ख्याती चौधरी यांनी केले, ज्यांच्या रसाळ निवेदनामुळे कार्यक्रमात उत्साह टिकून राहिला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. एस. यू. बोंबटकार यांनी प्रास्ताविक मांडून आयोजनामागील भूमिका विशद केली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीम, विविध विभागांचे फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स, कर्मचारी वर्ग व क्लास रिप्रेझेंटेटिव्हज यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरणाची जबाबदारी तेजस हिंगे व अमोल बिऱ्हाडे यांनी पार पाडली. प्रशिक्षणाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या अनुभवामुळे मुलाखतीची भीती निघून गेल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी समापनानंतर प्रा. सदाशिव लवंगे यांनी आभार प्रदर्शन केले. या यशस्वी उपक्रमाबद्दल व्यवस्थापन मंडळ चे सदस्य श्री. देवेंद्र पाटील, श्री. पराग पाटील व डॉ. गौरव कोलते यांनी सर्व आयोजकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)