जळगाव : रामदास कॉलनीतील मनोकल्प या कंपनीच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून तेथील साहित्य व रोख रक्कम लुटून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी राजेश घनश्याम पाटील (99, रा शिवरामनगर) यांना शनिवारी रात्री शिव कॉलनीत महामार्गावरून पळून जाताना सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली. रविवारी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. मनोकल्प ट्रेडिंग अॅण्ड सर्व्हिसेसचे संचालक मनोज लिलाधर वाणी (४०, रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांच्या रामदास कॉलनीतील कार्यालयात ३१ ऑक्टोबर रोजी दोन वाहनांतून आलेल्या ११ जणांनी बळजबरीने कार्यालयाचे मूळ रेकॉर्ड, मौल्यवान दस्तऐवज, संगणक, लॅपटॉप, पूजेचे सोने-चांदीचे शिक्के व रोख रक्कम नेल्याची फिर्याद मनोज वाणी यांनी दिली होती. त्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी ११ जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता तीन जणांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. राजेश पाटील शनिवारी चारचाकीतून महामार्गाने पळून जात असल्याची माहिती मिळाल्यावरून रामानंदनगर पोलिसांनी शिव कॉलनीजवळ त्यांना सिनेस्टाईल अटक केली. तपास अधिकारी गोपाळ देशमुख यांनी त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

.jpg)