जळगाव जामोद : उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील प्राचीन संस्कृती संवर्धन व जतन, सौर ऊर्जा प्रकल्प अशा विविध विषयांना मान्यता देण्यात आल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ. संजय कुटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिगाव प्रकल्पाला सुमारे २७०० कोटी रुपये मिळणार आहेत. अरकचेरी प्रकल्पाला ९९ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सोमवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाशी निगडित विविध विषय मान्यतेसाठी सादर करण्यातआले त्यामध्ये जमीन संपादनासाठी संयुक्त मोजणीमध्ये असलेल्या दादलगाव, हिंगणेवालापूर, मानेगाव, टाकळीखासा, येरळी, टाका, कोदरखेड येथील विविध मालमत्ता निवाड्यातून वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मनात तीव्र स्वरूपात असंतोषाची भावना निर्माण झाली होती. या बाबीचा आमदार कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार ६२ कोटी रुपये किमतीचा सानुग्रह मोबदला मंजूर झाला आहे. जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भोन येथील प्राचीन संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याच्या ५८० कोटींच्या कामास मंजुरी दिली आहे.

