बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या एका अत्यंत लाजिरवाण्या व अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, कोणत्याही समाजातील महिलेला विवस्त्र करून मारहाण करणे ही मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष, तथा करवंड महोत्सवाचे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील यांनी व्यक्त केली आहे. रानटी प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा मध्येच अशी संतापजनक घटना घडणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. गावचा प्रमुख म्हणून सरपंचावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असताना चिखला येथील सरपंचानेच कायदा हातात घेत महिलांवर अमानुष मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर असून, ही कृती आरोपींच्या विकृत व जातीयवादी मानसिकतेचे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून ते कोणत्याही एका जाती-धर्मापुरते मर्यादित नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
या घटनेत काही महिलांना फरफटत नेऊन मारहाण करण्यात आल्याने आरोपींचे कृत्य हे रानटीपणाचे अत्यंत घृणास्पद उदाहरण असल्याचे जवंजाळ पाटील म्हणाले. संबंधित सरपंचाचे पद तात्काळ रद्द करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच जखमी महिलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

