आत्मनिर्भर युवती अभियान व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



मेहरूण, जळगाव — इकरा एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरूण, जळगाव येथे दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान व्याख्यानमाला विद्यार्थिनींसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरली. या सहा दिवसीय व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना स्वावलंबन, आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात डॉ. नयना महाजन यांनी सायबर क्राईम व सोशल मीडियाचा योग्य वापर या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल जगतात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी विद्यार्थिनींना समजावून सांगितली.

यानंतर कुर्बान तडवी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन शासकीय सुविधांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. चेतन आर. पाटील यांनी बँक व्यवहार व बचत योजनांची माहिती देत आर्थिक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले.

डॉ. प्रियंका चौधरी (MBBS, MS) यांनी महिलांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. पुढील सत्रात मसूद सर यांनी विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन (HB) तपासणीचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष चाचणी केली.

पल्लवी भोगे यांनी स्वयंरोजगाराच्या संधी स्पष्ट करत विद्यार्थिनींना उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. त्यानंतर नेतृत्व गुण, सॉफ्ट स्किल्स व विविध कलागुण विकासावर डॉ.अंजली   बोंदर यांनी मार्गदर्शन केले.

समारोप सत्रात मुलींचे विचार व व्यक्तिमत्व विकास या विषयावर संवाद साधण्यात आला. विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न विचारले.

या व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून डॉ. कहकशा अंजुम यांनी नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. युवती सभेअंतर्गत कार्यरत महिला प्राध्यापक डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. फिरदोस शेख आणि डॉ. शबाना खाटिक तसेच महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत सक्रिय सहभाग नोंदविला.

या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्ञान व प्रेरणा मिळाली. महाविद्यालय प्रशासनाने सर्व मान्यवर वक्ते, सहभागी विद्यार्थिनी व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)